मराठी भाषेचा इतिहास

पार्श्वभूमी : 
भूतकाळातील मराठीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा  -

एखादी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात.
उद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (तुळपुळे, १९७३ पृ. ५)
दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य
दिण्णले गहिल्ले उल्लेविरे तत्थ मरहट्टे

त्यात धिप्पाड, सावळ्या, काटक, काहीशा अहंकारी अशा मराठ्यांचा (मरहट्टे) उल्लेख येतो तसेच ते ‘दिले, घेतले असं बोलतात’ (दिण्णले गहिल्ले) असे म्हणताना त्यांच्या भाषेचाही उल्लेख येतो. इ.स. ८५९ मधल्या धर्मोपदेशमालेतही मरहट्ट असं भाषेचं नाव आलं आहे. मराठीच्या अस्तित्वाविषयीचे हे अप्रत्यक्ष पुरावे आहेत. इ.स. १०६० मधल्या दिवे आगरच्या ताम्रपट मराठीचं अस्तित्व ओळखता येईल इतपत महत्त्वाचे उल्लेख आढळतात. (तुळपुळे, १९७३, पृ. ५-६)..!!

यादवकाळ :
मराठीच्या अस्तित्वाविषयीचे सर्व तुरळक उल्लेख पाहत आपण यादवकाळात आलो की मराठीचं ठळक चित्र रेखाटता येऊ लागतं. अर्थात पूर्वी भाषा नोंदवण्यासाठी मुद्रण, ध्वनिमुद्रण इत्यादी साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपल्याला मुख्यत्वे लिपिबद्ध झालेल्या भाषांविषयीचीच थेट साधनं आढळू शकतात. महानुभाव पंथाचं साहित्य म्हणजे यादवकालीन मराठी भाषेच्या अभ्यासाचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.

मराठी ही महानुभाव पंथाची धर्मभाषा होती. महानुभाव पंथाचे आचार्य श्री चक्रधरस्वामी हे जन्मले गुजरातेत. पण त्यांनी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’असा आदेश दिला आणि त्यांच्या शिष्यांनी तो आग्रहाने पाळला. ‘लीळाचरित्र’ ह्या इ. स.१२०० च्या सुमारास (कोलते, १९७८, प्रस्तावना पृ. ६५) रचलेल्या श्री चक्रधरस्वामींच्या महमिभट्टरचित चरित्रात केवळ चक्रधरस्वामींचंच नव्हे, तर यादवकाळातल्या मराठीच्या विविध आविष्काराचंही दर्शन घडतं. ‘काऊळेयाचे घर सेणाचे। साळैचे मेणाचे। पाऊसाळेया काऊळेयाचे घर पुरे जाय।...’’ ही लीळाचरित्रात आढळणारी काऊचिऊची गोष्ट आजही मराठी घरांत लहान मुलांना सांगितली जाते.

(तुळपुळे, १९७३, पृ. २४)
ह्या काळात मराठी ही लोकभाषा म्हणून स्थिरावलेली दिसते. सार्वजनिक ठिकाणी आढळणार्‍या शिलालेखांची भाषा मराठी हीच असलेली दिसते. धर्माच्या क्षेत्रातही संस्कृत भाषेचा अभिमानी वर्ग ज्ञानाची भाषा ही संस्कृतच असल्याचे सांगत असता दुसरीकडे मात्र लोकभाषा हेच आपल्या उपदेशाचं माध्यम म्हणून वापरणारे विविध धर्मपंथ ह्या काळात उदयाला आलेले दिसतात. नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त ह्या पंथांच्या अनुयायांनी मराठी विविध प्रकारे समृद्ध केलेली दिसते.

नाथपंथाची परंपरा लाभलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्र्वरी रचताना मराठी भाषेविषयी आपल्याला वाटत असलेला आत्मविश्र्वास व्यक्त केला आहे.
माझा मर्‍हाटाचि बोलु कवतिके। परि अमृतातेंहि पैजासि जिंके।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन।।

ही प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी अक्षरश: खरी केलेली आढळते. त्यांनी आपला अमृतानुभव हा स्वतंत्र सिद्धान्त मांडणारा ग्रंथही मराठीतच रचून मराठी ही केवळ लोकभाषाच नव्हे, तर ज्ञानभाषाही आहे हे सिद्ध केलं आहे. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, सावता माळी, गोरोबा कुंभार ह्या सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या अभिव्यक्तीचं स्वाभाविक माध्यम म्हणून मराठीचाच वापर केल्याचं आढळतं. ह्या दृष्टीने पाहता यादवकाळ हा मराठीचा उत्कर्षाचा काळ आहे असं सार्थपणे म्हणता येतं.
परचक्र -
इ.स. १२९६ ह्या वर्षी महाराष्ट्रावर अलाउद्दीन खिलजी ह्याने स्वारी केली आणि यादवांचा पराभव केला (मेहेंदळे, १९९६, पृ. १०९). इ.स. १३१५ च्या दरम्यान यादवसत्तेचा अस्त झाला (मेहेंदळे, १९९६, पृ. १११) आणि पुढच्या काळात महाराष्ट्र काही शतकं विविध सुलतानांच्या आधिपत्याखाली होता. ह्या काळात प्रशासनात प्रामुख्याने फारसी, अरबी ह्या भाषांचा वापर होऊ लागला. सर्वसामान्य लोकांशी संपर्काचं माध्यम म्हणून मराठीचा वापर होत असला, तरी ह्या मराठीवर फारसीचा प्रचंड प्रभाव पडलेला आढळतो. मराठीत प्रचंड प्रमाणात फारसी शब्दांचा समावेश ह्याच काळात झालेला आढळतो.

मात्र धार्मिक व्यवहारात संस्कृताचं प्राबल्य टिकून होतं. संत एकनाथांच्या लिखाणात त्यांनी ‘संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासौन झाली।।’’

असा प्रश्र्न विचारलेला आढळतो ह्यावरून धार्मिक व्यवहारात मराठीच्या वापराला संपूर्णपणे प्रतिष्ठा लाभलेली नव्हती असं दिसतं. मात्र नाथांनी आणि अन्य वारकरी संतांनी लोकभाषेचा पुरस्कार सोडलेला दिसत नाही. दासोपंतांसारखा कवी अर्थाच्या अभिव्यक्तीत संस्कृतापेक्षा मराठीच अधिक समृद्ध आहे असा युक्तिवाद करताना आढळतो, तो पुढीलप्रमाणे...

संस्कृते घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती।
कवणा घटाची प्राप्ती। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। कैसी?...
ऐसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन? (महाराष्ट्र - गाथा, पृ. २८)
मराठीच्या लिप्या -
ह्या काळात मराठी भाषा लिहिण्यासाठी दोन वेगवेगळ्या लिप्यांचा वापर होत असलेला आढळतो. एक म्हणजे बाळबोध किंवा देवनागरी लिपी आणि दुसरी लिपी म्हणजे मोडी लिपी. मोडी लिपी ही हेमाडपंत ह्या यादवांच्या प्रधानाने शोधली असं एक मत आहे. तर काहींच्या मते मोडी हे देवनागरीचंच शीघ्र लेखनासाठी वापरायचं रूप आहे. मोडीचा वापर मुख्यत्वे प्रशासकीय व्यवहारात होत असलेला दिसतो.
मराठीला रोमीतून (रोमन) मुद्रणसंस्कार -
ह्याच काळात युरोपीय ख्रिस्ती धर्मप्रसाराकांनी आपल्या धर्मप्रसारासाठी मराठी भाषेचा अवलंब केलेला आढळतो. इथल्या नव्याने ख्रिस्ती होणार्‍या लोकांकरिता त्यांच्या भाषांतून धर्मपुस्तके पुरवावीत ह्यासाठी मराठीतून लेखन झाले.  धर्मप्रसारासाठी इथे येणार्‍या आपल्या धर्मबांधवांना इथल्या भाषा शिकता याव्यात ह्यासाठी मराठीविषयी त्यांनी आपल्या भाषांतून रचना केल्या. फादर स्टीफन्स ह्यांनी लिहिलेलं ओवीबद्ध मराठी ‘‘क्रिस्तपुराण’’ रोमी (रोमन)लिपीतून इ.स. १६१६ ह्या वर्षी रायतूरला छापलं गेलं. त्याच्या गद्य प्रस्तावनेत फादर स्टीफन्स म्हणतात. ‘‘हे सर्व मराठी भासेन लिहिले आहे. हेआ देसिंचेआ भासांभितुर ही भास परमेस्वराचेया वस्तु निरोपुंसि योग्ये एसी दिसली म्हणउनु’’ (मालशे पृ. ४२) त्यांनीच ‘‘आर्त द लिंग्व कानारिम्’’ हे मराठीच्या कोकणी बोलीचं व्याकरण पोर्तुगाली भाषेत लिहिलं. ते इ. स. १६४० ह्या वर्षी मुद्रित झालं..!!

शिवकाल -
छत्रपती शिवाजी महाराजांनी शके १५६२ (इ.स.१६४१-४२) ह्या सुमाराला आपला स्वराज्यस्थापनेच्या कार्याचा आरंभ केला आणि पुढील काळात त्याला यशही आलं. शिवकालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहाराची भाषा अर्थातच मराठी होती. त्या काळात अन्य राजवटींत राज्यकारभाराची मुख्य भाषा फारशी ही होती. शिवकालीन मराठीवरही फारशीचा प्रचंड प्रभाव असलेला दिसून येतो. मुजुमदार, सरनोबत, हवालदार इत्यादी अधिकार्‍यांची नावं, पीलखाना, जवाहरखाना आदी विभागांची नावं आणि सुत्तरनाल, तोफ इ. शस्त्रांची नावं असे अनेक फारसी शब्द मराठीत आले होते. अर्थात शिवकालात झालेल्या पद्यमय साहित्यव्यवहारात मात्र फारशीचा प्रभाव तितका जाणवत नाही.

ह्या पार्श्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या फारशी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देणारा राज्यव्यवहारकोश रचला गेला. शिवाजी महाराजांच्या अधिकार्‍यांच्या मुद्रा ह्या काही अपवाद वगळता मराठी वा संस्कृतातच होत्या (मेहेंदळे, १९९६, पृ. ६४०). शिवकाळात राज्यव्यवहार मुख्यत्वे मराठीत होताना आढळतो.

इंग्रजांकडून मराठ्यांकडे जी लेखी करारपत्रं वगैरे जात ती मराठीतच असत. मराठ्यांकडून इंग्रजांना जाणारी काही पत्रं तरी मराठीत असावीत असं अनुमान करायला वाव आहे. चौलचा सरसुभेदार बहिरोपंत ह्याने मुंबईचा गव्हर्नर हेन्री ऑक्झिंडेन ह्याला पाठवलेलं पत्र मराठीत होतं आणि नंतर त्याचं भाषांतर करण्यात आलं अशी माहिती आढळते. (मराठी संशोधनपत्रिका, जानेवारी, १९५४, पृ. १३)

शिवकालात आणि त्यानंतरच्या काळात गद्य मराठी भाषेवर फारशीचा काही एक प्रभाव आढळतो. ह्या दृष्टीने बखरींची भाषा पाहण्यासारखी आहे.

पेशवेकाळात राज्यव्यवहाराची भाषा मराठीच होती. तिच्यावर फारशीचा प्रभावही असलेला दिसून येतो. ह्या काळात मराठी सरदारांची संस्थानं महाराष्ट्राबाहेर निर्माण झाली. त्या भागांत मराठी भाषिक जनतेचं वास्तव्य होऊ लागलं, त्यातून त्या-त्या ठिकाणी मराठी भाषेचा प्रसार झाला..!

आधुनिक काळ -
ज्ञानभाषा बनवण्याचे प्रयत्न -
विद्यापीठात मराठीला प्रवेश नसला, तरी मराठी भाषा ज्ञानसमृद्ध व्हावी ह्या दृष्टीने समाजात विविध मंडळींनी प्रयत्न केलेला आढळतो. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी १९१६ ते १९२७ ह्या कालावधीत ‘‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’’ हा ज्ञानकोश मराठीत निर्माण केला. सर्व स्तरांवर मराठीतूनच शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न विष्णु गोविंद विजापूरकर ह्यांनी केला. विविध व्यक्ती आणि संस्था ह्यांनी स्वभाषावृद्धीच्या हेतूने मराठी भाषेत मोलाचं वाङ्मय निर्माण केलं.
भाषाशुद्धीची चळवळ -
मराठीत आलेल्या फारशी आणि इंग्रजी शब्दांना पर्याय देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, माधवराव पटवर्धन ह्यांनी भाषाशुद्धीची चळवळ उभारली. अनेकांनी ह्या चळवळीला विरोध केला असला तरी दिनांक, क्रमांक, विधिमंडळ, महापौर, नगरपालिका, नगरसेवक, संचलन, गणवेश, दूरध्वनी, टंकलेखन असे आजच्या मराठीत रुळलेले अनेक शब्द ह्या चळवळीनेच रूढ केले.
संयुक्त महाराष्ट्र : मराठी भाषकांच्या एकीकरणाचा प्रयत्न -
लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी बांग्ला भाषकांच्या आंदोलनामुळे १९११ ह्या वर्षी रद्द करण्यात आली. त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या लेखात न. चिं. केळकर ह्यांनी ‘‘मराठी भाषा बोलणार्‍यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी’’, अशी सूचना केली. (फडके, १९९७, पृ. ३५३) दिनांक ६ जानेवारी, १९४० ह्या दिवशी उज्जैनच्या साहित्य संमेलनात ग. त्र्यं. माडखोलकर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकभाषिक राज्याच्या मागणीचं आवाहन केलं. (फडके, १९९७, पृ. ३५५) ह्या एकीकरणाविषयी मतमतांतरं असली, तरी मराठी भाषकांचं एकीकरण व्हावं ह्या मागणीचा जोर वाढू लागला. ह्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उदयाला आली. १९४६ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र परिषद ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. १९२१ पासून कॉंग्रेस पक्ष भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार करत होता. पण स्वातंत्र्य जवळ येऊ लागताच हा प्रश्र्न अग्रक्रमाने सोडवण्याची निकड नाही असं नेहरू आदी ज्येष्ठ नेत्यांचं मत होतं. स्वातंत्र्योत्तर काळातही ह्या प्रश्र्नावरून बरंच मोठं आंदोलन होऊन दिनांक १ मे, १९६० ह्या दिवशी महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य अस्तित्वात आलं. (संयुक्‍त महाराष्ट्रासाठीचा आंदोलनाची सविस्तर माहिती 'महाराष्ट्राविषयी विशेष-इतिहास' या विभागात दिली आहे.)
राजभाषा मराठी -
महाराष्ट्राचं भाषिक राज्य अस्तित्वात आल्यावर मराठी भाषा ही शिवकालानंतर पुन्हा राजभाषापदी विराजमान झाली. प्रशासनिक व्यवहारात मराठीचा वापर अनिवार्यपणे व्हावा असे आदेश निघाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्या पुढाकारातून विविध व्यवस्था अस्तित्वात आल्या. इंग्रजीतून चालणारा राज्यकारभार मराठीतून चालवण्यासाठी ‘भाषामंडळाची स्थापना झाली आणि राजभाषा म्हणून मराठीच्या वापराची पूर्वतयारी करण्यासाठी ‘भाषा-सल्लागार-मंडळाची स्थापना झाली. २६ जानेवारी, १९६५ च्या गणराज्य दिनापासून ‘महाराष्ट्र-राजभाषा-अधिनियम’ अस्तित्वात आला. (कोलते, १९८९, पृ. ५२-५४)

शासकीय कार्यालयांच्या व अधिकारपदांच्या इंगजी संज्ञांचे मराठी पर्याय देणारा ‘पदनामकोश’ प्रकाशित झाला. १९७३ ह्या वर्षी ‘शासन-व्यवहार-कोश’ प्रकाशित झाला. विविध ज्ञानशाखांतील पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय सुचवणारे विविध कोश अस्तित्वात आले. ह्या कोशांच्या भाषेविषयी ‘ही दुर्बोध आणि संस्कृतप्रचुर आहे’, अशी टीकाही झाली. पण आज ह्या पारिभाषिक संज्ञा शासनव्यवहारात बर्‍याच प्रमाणात रुळलेल्या आढळतात. मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध संस्था, महामंडळं ह्यांची स्थापना करण्यात आली.

वर्‍हाडी, अहिराणी इ. मराठी भाषेच्या विविध बोली असून प्रांतपरत्वे भाषेच्या रचनेत भेद आहेत. मराठीच्या प्रमाणीकरणाच्या दृष्टीने मराठी-साहित्य-महामंडळाने मराठी शुद्धलेखनाची नियमावली १९७२ ह्या वर्षी तयार केली. शिक्षणव्यवहारात मराठीचा समावेश माध्यमिक स्तरापर्यंत झाला. मात्र उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही अपवाद वगळता सर्व विषय मराठीतून शिकण्या-शिकवण्याचे प्रयत्न फारसे झालेले दिसत नाहीत. शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा पुरेसा विकास झाला नाही. तिला तशी संधीच फार कमी लाभली. मात्र मराठी वाङ्मय हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिकण्याचीही सोय उपलब्ध झाली. चित्रपट, नाटक, वाङ्मय अशा क्षेत्रांत मराठी भाषेतल्या कलाकृतींचा दबदबा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ही माध्यमं आपल्या परीने समृद्ध परंपरा निर्माण करत आहेत..!!